बोईसरमध्ये अमनचा दमण पॅटर्न ! गुटखा विक्रीचा खुला बाजार...
बोईसर : राज्य सरकारकडून गुटख्यावर बंदी असतानाही, बोईसर शहरात गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. या अवैध धंद्याचा \'दमणपॅटर्न\' पद्धतीने विस्तार करत, अमन नावाचा गुटखा माफिया बोईसरमध्ये किराणा दुकानाच्या पाट्या लावून सर्रास गुटखा विक्री करत आहे.
गुजरातहून मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्करी करून बोईसरमध्ये आणला जातो आणि येथे डबल-तिब्बट दराने विकला जातो. गल्ल्या, मुख्य रस्ते, बाजारपेठा अशा प्रत्येक कोपऱ्यात नव्या टपऱ्या उभ्या राहत असून, स्थानिक तरुणांना या अवैध व्यवहारात वापरलं जात आहे.
ही विक्री केवळ कायद्याचे उल्लंघन नसून, तरुण पिढीच्या आरोग्यावर गदा आणणारी आहे. गुटख्याच्या सेवनामुळे तोंडाचे कर्करोग, पचनाच्या समस्या यांसारखे जीवघेणे आजार होण्याचा धोका वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केला आहे.
अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी अधूनमधून कारवाई केली असली तरी, अमनसारख्या माफियांकडून पुन्हा नव्या टपऱ्यांतून गुटख्याचा पुरवठा सुरूच राहतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते संतप्त असून, गुटख्याच्या विक्रीवर तातडीने बंदी आणून अमनसह या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, बोईसर गुटख्याच्या विळख्यातून सुटणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे.