बोईसर मध्ये कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह - अखेर गुंडांवर वरदहस्त कोणाचा?
कायदा सुव्यवस्थेचा उडाला बोजवारा
पालघर - बोईसर शहरात गेल्या २ दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघत आहेत. पोलिसांचा धाक राहिला नसल्याने गुंड टोळ्या रात्रीच्या अंधारात हातात चाकू, सुरे आणि कोयत्यासारखी धारधार शस्त्रे नाचवत एकमेकांवर खूनी हल्ले करीत असल्याने सर्वसामान्य नागरीक प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत.
बोईसर शहरात गेल्या दोन दिवसांत धारधार शस्त्राने हल्ला केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या हाणामारीत तीन जण गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी आत्तापर्यंत एकूण ३ आरोपींना बोईसर पोलिसांनी अटक करण्याची कारवाई केली आहे तर इतर ५ फरार आरोपींचा शोध विविध पथकांमार्फत सुरू आहे.
८ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास बोईसर शहरातील भैय्या पाडा भागात एका टोळक्याने पूर्व वैमनस्यातून व मुलीच्या छेडछाडीच्या रागातून संजीत मिश्रा या तरुणावर चाकूने वार करीत व लाकडी बॅटने हल्ला करीत त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर याच टोळक्याने यशवंतसृष्टी परीसरात रात्री १०.३० वाजता रेहान शेख (१९) या तरुणावर देखील लोखंडी रॉड व बॅटने हल्ला करीत जबर मारहाण केली. या हल्ल्यामध्ये जखमी झालेला संजीत मिश्रा याला उपचारासाठी बोईसरमधील आनंद हॉस्पीटल तर रेहान शेख याला स्टार लाईट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बोईसर पोलिसांनी राहुल सिंग याला अटक केली असून आरीफ शेख, अमन ठाकूर, रॉबिन सिंग व इतर पाच फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. काल ९ मे च्या रात्री ९.३० वाजेच्या सुमारास बोईसरमधील ओसवाल एंपायर या वसाहतीमधील भर रस्त्यावर भाजीपाला विक्रेता सनी रामचंद्र गुप्ता (२३) याच्यावर पैशाच्या देवाणघेवाणीवरून प्रवीण राजपुरोहीत याने कोयत्याने सपासप वार करून जखमी केले तर आपल्या भावास वाचवण्यासाठीआलेल्या सूरज गुप्ता याच्यावर देखील कोयत्याने हल्ला करून आरोपी कारमधून पळून गेला.
बोईसरमधील ओसवाल एंपायर सारख्या गजबजलेल्या परीसरात रात्रीच्या सुमारास घडलेल्या या सशस्त्र हल्ल्यामुळे रस्त्यावरील नागरीकांची पळापळ झाली. या हल्ल्याप्रकरणी आरोपी प्रवीण राजपुरोहीत आणि कटात सहभागी असलेला कार चालक आकाश सिंग यांच्यावर कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर करित आहेत.
दरम्यान, बोईसर मधील या सशस्त्र हल्ल्याचा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा, बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रदीप कसबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक शरद सुरळकर, विठ्ठल मनिकेरी आणि आशिष पाटील यांनी रात्रभर कोंबिंग ऑपरेशन करीत तीन आरोपींना अटक केली आहे.
चोरीछुपे बेकायदा धंदे करणाऱ्या टोळ्या सक्रिय:
तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये विविध प्रकारचे जवळपास १२०० कारखाने असून यामध्ये लाखोंच्या संख्येने कामगार काम करीत आहेत. यात परप्रांतीय कामगारांची संख्या देखील लक्षणीय आहे. बोईसर - तारापूर परीसरात वास्तव्य करणाऱ्या नागरीकांमुळे बेकायदा धंद्यांचा अक्षरक्ष सुळसुळाट झालेला पाहावयास मिळत आहे. चरस गांजा सारखे अंमली पदार्थ विक्री, दिवसा ढवळ्या स्टेशन परीसरात सुरू असलेले जुगार - मटका, भंगार आणि केमिकल चोरी, एमआयडीसीमधील रासायनिक सांडपाणी व घातक घनकचरा यांचे चोरी छुपे विल्हेवाट लावणाऱ्या माफीया टोळ्या सक्रीय आहेत. कामगार, भंगार, केमिकल कंत्राट आणि इतर बेकायदा धंद्यामध्ये वर्चस्व मिळविण्यासाठी या टोळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चढाओढ सुरू असते.
पोलिसांचा धाक संपला
भर रस्त्यावर वस्तीच्या ठिकाणी कोयत्याने वार! तोही एकटयादुकट्याने नाही तर जमावाने एकत्र येऊन केलेला! बोईसरमध्ये प्रथमच असा प्रकार घडला असे नाही तर आता ते नेहमीचेच झाले आहे. त्यातून पोलीसांचा या शहरात कसलाही वचक राहिला नसल्याचे पुढे आले आहे. मारहाणीच्या सलग घटनांमुळे बोईसरमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशत माजवणाऱ्या टोळक्यांचा उन्माद वाढल्याने बोईसर शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस अपयशी ठरले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी राज्याच्या गृहखात्याने वेळीच हस्तक्षेप करावा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी चर्चा सर्वत्र होत आहे.