कुकडे येथील रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराची दुर्गंधी; दोषींवर कारवाईची मागणी
पालघर!कुकडे गावात जिल्हा परिषद निधीतून सुमारे १० लाख रुपये खर्च करून करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. २५ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत सुरू असलेले हे काम केवळ तीन दिवसांत म्हणजेच ३० मार्च रोजी पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्ष पाहणीअंती रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, कोणताही आराखडा न पाळता हे काम करण्यात आल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अखत्यारीत असूनही जिल्हा परिषदेच्या निधीचा वापर करून ही कामे उरकण्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. मागील वर्षाच्या मंजूर ठेक्याचे काम प्रलंबित असतानाही घाईघाईत बिल काढण्यासाठी कनिष्ठ अभियंता कांबळे यांच्या देखरेखीखाली या रस्त्याचे काम पार पाडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप नोंदवले असून, कामादरम्यान कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नव्हता. परिणामी, संपूर्ण काम पारदर्शकतेशिवायच पार पडल्याची तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून थेट मातीवरच काँक्रीटीकरण करण्यात आले असून, बेस व भरण्याची प्रक्रिया टाळण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे रस्त्याची टिकाऊपणा आणि सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तसेच, आराखड्याच्या तुलनेत रस्त्याची लांबी व रुंदी अपूर्ण असून अनेक ठिकाणी रस्ता इतका अरुंद आहे की वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय, काम सुरू असताना पर्यायी मार्ग न देता थेट मुख्य रस्त्यावरच वाहतूक बंद करून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागल्याचेही निदर्शनास आले आहे.
सदर प्रकरणात ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याची जोरदार चर्चा ग्रामस्थांमध्ये असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.