ईएसआयसी (ESIC )योजना कोणास व किती फायदेशीर आहे, त्यांची थोडक्यात माहिती
कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC- Employees’ State Insurance Corporation) ही सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही आरोग्य विमा योजना आहे. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना चालविली जाते.
या योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या कर्मचार्यांना तसेच त्यांच्यावर अवलंबून असणार्यांना आजारपणासाठी तसेच इतर अनेक फायदे मिळतात.
योजना कोणाला लागू :
दुकाने अथवा संस्था इ. ज्या ठिकाणी दहा पेक्षा जास्त कर्मचारी कामासाठी आहेत अशा प्रत्येक ठिकाणी ESIC योजना लागू होते.
यासाठी कर्मचार्याचे मासिक वेतन हे रुपये एकवीस हजार (२१,०००) पेक्षा कमी असणे अनिवार्य आहे. मात्र अपंगत्व असणार्या कर्मचार्यांसाठी हीच मर्यादा रुपये पंचवीस हजार (२५,०००) असेल.
या योजनेसाठी कर्मचार्याच्या वेतनाच्या ०.७५% कर्मचार्याकडून तर ३.७५% कंपनीकडून योगदान घेतले जाते ही टक्केवारी वेळो-वेळी बदलत असते.
नोंदणी :
कर्मचारी सर्व प्रथम कामावर रुजू झाल्यानंतर त्यांची ESIC अंतर्गत नोंदणी केली जाते व नोंदणी झाल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड दिले जाते.
आपण नोकरी बदलली तरी आपला ESIC क्रमांक हा तोच राहतो. आपल्याला फक्त तो क्रमांक नव्या कंपनीत द्यावा लागतो.
फायदे :
ESIC योजनेंतर्गत कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबाला वैद्यकिय सुविधा पुरवल्या जातात. ESIC च्या रुग्णालयात कर्मचाऱ्यांना मोफत इलाज केला जातो. गंभीर आजार असल्यास खासगी रुग्णालयात पाठविल्यास इलाजाचा संपूर्ण खर्च ESICद्वारा केला जातो.
कर्मचारी एखाद्या गंभीर आजाराने नोकरी करण्यास असमर्थ असल्यास ESIC कडून कर्मचाऱ्याला पगाराच्या ७० टक्के रक्कम देण्यात येईल. जर कर्मचारी काही कारणामुळे अपंग झाल्यास, त्याला पगाराच्या ९० टक्के रक्कम दिली जाईल. कायमस्वरुपी अपंगत्वावर आजीवन पगाराच्या ९० टक्के वेतन दिले जाते.
ESIC मध्ये महिलांना प्रसूती रजा दिली जाते. प्रसूती रजेसह ६ महिन्यांचं वेतनही दिलं जातं. ६ महिन्यांचं वेतन ESIC कडून देण्यात येतं. काही कारणास्तव गर्भपात झाल्यास, ६ आठवड्यांची वेगळी सुट्टीही देण्यात येते.
कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही ESIC चा फायदा मिळतो. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना पेन्शन सुविधा लागू होते.