शेतकऱ्याच्या शेतात खुलेआम घातक रासायनिक पाणी सोडणाऱ्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषित *Resonance Specialities Ldt.* कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करणार का?
घातक रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यावर कारवाई होणार का
बोईसर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक टी-१४० मे. रेसॉन्स स्पेशालिस्ट लि. या केमिकल उत्पादक कारखान्याकडून घातक रासायनिक पाणी पाम येथिल शेतकऱ्यांचा शेतात खुलेआम सोडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तारापूरातील प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिनांक २२ नोव्हेंबर २२ रोजी पाहणी करण्यात आली होती. तसा अहवाल उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्याकडून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला होता. सदर कंपनीकडून इ. टी. पी. बायपास करत शेतकऱ्यांच्या शेतात खुलेआम घातक रासायनिक पाणी सोडत असल्याचे निदर्शनास आले होते. तर या आधी दिनांक २४मार्च २१ रोजी देखील कारखान्याकडून अश्याच प्रकारे घातक रासायनिक पाणी खुलेआम सोडत असल्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. पुन्हा एकदा याच कारखान्याकडून घातक रासायनिक पाणी शेतकऱ्यांचा शेतात सोडणाऱ्या कारखान्याला प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंदळे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावत वारंवार पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रदुषित कारखान्याला वाचविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
औद्योगिक क्षेत्रातील अनेक प्रदुषित कारखान्याचे अहवाल उपप्रादेशिक अधिकारी तारापूर येथून कारवाईसाठी पाठविण्यात आलेले असून प्रादेशिक अधिकारी कार्यालयातील अनेक वर्षे तळ ठोकून बसलेला क्षेत्रीय अधिकारी तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाठविलेल्या अहवालात संधी साधत कारखान्याचा प्रदुषणातून सुवर्ण मध्य काढत थातूरमातूर कारवाई करणारी नोटीस बजावत आहे.
दरम्यान पाम ग्रामपंचायत हद्दीतील कॅलेक्स कारखान्यावर कारवाईसाठी पाम ग्रामपंचायतीत ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आलेला असून त्याच ग्रामपंचायत हद्दीतील असलेल्या शेतकऱ्यांचा शेतात रासायनिक पाणी सोडणाऱ्या रेसॉन्स स्पेशालिस्ट लि.कारखान्यावर कारवाईसाठी पाम ग्रामपंचायतीकडून पुढाकार घेणार का ? असा सवाल उपस्थित झाला आहे