मुरबे बंदर जनसुनावणीसाठी पालघर पोलीसांचा कडक बंदोबस्त

   

पालघर | प्रस्तावित मुरबे बंदर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी पालघर येथील जिल्हा क्रीडा संकुल, दांडेकर कॉलेज समोर जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालघर पोलीस दलातर्फे व्यापक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

     जनसुनावणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष तयारी केली आहे. १२४ पोलीस अधिकारी, १०६९ पुरुष व महिला अंमलदार, ८ स्ट्रायकिंग पथके, १ एसआरपीएफ तुकडी, २ आरसीपी व २ जलद प्रतिसाद पथके या बंदोबस्तात सहभागी असतील. तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे ३ अधिकारी व ३२ अंमलदार वाहतूक नियंत्रणासाठी तैनात करण्यात आले आहेत.

     नागरिकांनी आपली मते, आक्षेप आणि सूचना शांततेत व कायद्याचे पालन करून मांडावीत, असे आवाहन पालघर पोलीस दलाने केले आहे. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था भंग होईल असे कृत्य करू नये, तसेच संशयास्पद हालचाली अथवा व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

     या संदर्भात पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  यतिश देशमुख (भा.पो.से.) यांनी सांगितले की, “जनसुनावणी हा नागरिकांना आपले म्हणणे मांडण्याचा लोकशाही मार्ग आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनावर विश्वास ठेवावा आणि पोलिसांना सहकार्य करावे.”

      मुरबे बंदर जनसुनावणीदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पालघर पोलीस सज्ज असून, नागरिकांचा प्रतिसाद संयमी आणि शांततापूर्ण राहील, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

    Post Views:  232

मुख्य संपादक

Card image

संतोष मधुकर घरत

आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501

Phone: 9766554999