विरार | विरार (पश्चिम) येथील मारंबळपाडा–जलसार दरम्यान सुरू असलेल्या रो-रो सेवेचा आजचा प्रवास प्रवाशांसाठी त्रासदायक ठरला. आज दुपारी ३ वाजता जलसारहून सुटलेली बोट सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतही मारंबळपाडा जेट्टीवर पोहोचू शकली नाही, परिणामी प्रवाशांना तब्बल दीड तासांहून अधिक काळ बोटीमध्येच अडकून राहावे लागले.
हायड्रॉलिक रॅम्पमध्ये तांत्रिक बिघाड
मिळालेल्या माहितीनुसार, रो-रो बोटीच्या हायड्रॉलिक रॅम्पमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने बोट जेट्टीला लागण्यात अडचण निर्माण झाली. त्यामुळे प्रवाशांना बोटीबाहेर पडता आले नाही. उष्णता आणि गजबजलेल्या परिस्थितीमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचा आरोप
या बोटीतील काही प्रवाशांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करताना सांगितले की, \"दररोज बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतले जातात, आणि सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष होते\". काही स्थानिक नागरिकांनी देखील रो-रो सेवेमध्ये सुरक्षेच्या बाबतीत बेफिकिरी होत असल्याचा आरोप केला आहे.
प्रशासनाकडे कारवाईची मागणी
घटनेची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, समुद्री सुरक्षा यंत्रणेकडून सखोल तपास सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. या घटनेनंतर परिसरातील रो-रो सेवेच्या सुरक्षिततेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.