बोईसरमध्ये पावसाळ्यापूर्वी सुरक्षेचा उपाय – ग्रामपंचायतीकडून रस्त्यालगत झाडांची छाटणी सुरू
बोईसर, ता. २४ जून – पावसाळा सुरू झालेला असून, वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर आदळून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. महावितरण विभागाने वेळेवर झाडांची छाटणी न केल्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पुढील काळात जगन्नाथ रथयात्रा, गणेशोत्सव आणि इतर धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यालगत झाडांची वाढ ही गंभीर अडचण ठरू शकते. झाडांच्या फांद्या रस्त्यावर वाकलेल्या असून, काही ठिकाणी त्या विद्युत खांबांनाही स्पर्श करत आहेत.
ही परिस्थिती लक्षात घेता, बोईसर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रभारी सरपंच निलम संखे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कामावर लावून झाडांची छाटणी सुरू करण्यात आली आहे. हे कार्य समाजहित लक्षात घेऊन करण्यात येत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ही जबाबदारी महावितरण विभागाची असतानाही ग्रामपंचायतीने पुढाकार घेत नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हे काम सुरू असून, लवकरच बोईसर ग्रामपंचायतच्या हद्दीतील रहदारीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यालगत झाडांची छाटणी पूर्ण होईल, अशी माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे.