सुतारपाडा समाज मंदिरात गळतीचा सवाल – बांधकामात भ्रष्टाचाराचा संशय
ठेकेदारावर कारवाईसह तांत्रिक चौकशीची मागणी
पालघर, दि. १ जुलै: बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील सुतारपाडा येथे माजी आमदार राजेश पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या समाज मंदिराच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुमारे १० लाख रुपयांच्या खर्चातून २०२२-२३ या आर्थिक वर्षात हे समाज मंदिर बांधण्यात आले होते.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मंदिराच्या स्लॅबमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती (लिकेज) असून वापरलेले साहित्य हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. काम सुरू असतानाच ग्रामस्थांनी याबाबत बोईसर ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर यांना वेळेवर माहिती दिली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
सद्यस्थितीत या मंदिरावर ग्रामपंचायतमार्फत शेड बसविण्याचे काम सुरू आहे. परंतु, वापरलेले साहित्य हलक्या व निकृष्ट प्रकाराचे असल्यामुळे भविष्यात अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंता व संतापाचे वातावरण आहे.
या प्रकाराची तातडीने चौकशी करण्यात यावी, निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच तांत्रिक पथकामार्फत स्लॅबची सखोल तपासणी करून अहवाल तयार करण्यात यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ही लेखी तक्रार सुतारपाडा येथील ग्रामस्थ अतुल देसाई ,मनोज मोर,पंकज हाडल आणि तेजस काठे यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती पालघर व बोईसर ग्रामपंचायत यांना १ जुलै २०२५ रोजी सादर केली आहे.