निकावली-उर्से रस्त्याची झाली चाळण – पावसाआधीच कोसळला नव्याने बनवलेला रस्ता
निकावली (प्रतिनिधी) – डहाणू तालुक्यातील निकावली ते उर्से दरम्यानचा नव्याने तयार केलेला रस्ता पावसाआधीच कोसळल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून बनवलेला हा रस्ता काही महिन्यांतच उखडू लागल्यामुळे कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
घटनेचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, यात एक भरलेला डंपर रस्त्याच्या एका बाजूला खोल गेलेल्या फटीत अडकलेला दिसतो. या ठिकाणी रस्ता पूर्णपणे बसलेला आहे आणि बाजूला दुभाजकचाही अभाव आहे. त्यामुळे वाहतूक धोकादायक ठरू शकते.
स्थानिक ग्रामस्थांच्या मते, कामाच्या वेळेस निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आला होता आणि अनेकदा काम न करताच बिलं उचलल्याच्या तक्रारीही ऐकायला मिळाल्या होत्या. या घटनेमुळे अपघाताचा धोका वाढला असून, पावसाळ्यात हा रस्ता अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.