बोईसर हादरलं! दुर्लक्षित खोल खड्ड्यात पडून तिघा निरागस मुलांचा मृत्यू; जबाबदार कोण?

   

बोईसर, ता. २७ जून: बोईसर काटकर पाडा येथील दर्शन स्वप्नलोक इमारतीच्या बाजूला खोदलेल्या खोल खड्यात पडून तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ व त्यांच्याजवळ राहणारा एक शेजारी मुलगा यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, तसेच नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

      घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या जागेचे मालकी हक्क नेमके कोणाकडे आहेत? एवढा मोठा खड्डा खोदण्यात आला, तर त्या मातीचा नेमका उपयोग काय झाला? ती माती कुठे नेली गेली? सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे खोदकाम करण्यासाठी महसूल विभागाची परवानगी घेण्यात आली होती का?

     खड्डा इतका खोल असताना, तो उघडाच का सोडण्यात आला? योग्य ती काळजी घेतली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशी नागरिकांची भावना आहे. खड्डा बंद न करता तो उघडाच ठेवणं हे मोठं दुर्लक्ष मानलं जात असून, त्या ठिकाणी किमान संरक्षक कंपाऊंड तरी उभारण्यात यायला हवे होते.

     या अपघातात निरपराध मुलांचा जीव गेला आहे, आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित जमिनीचा मालक, खोदकाम करणारे व्यक्ती किंवा संस्था, आणि माती कुठे व कशी वाहून नेण्यात आली याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

     सदर खड्डा हा रेल्वेने खोदला असल्याचे सर्व स्तरावरून चर्चा सुरू असून चौकशी अंती स्पष्ट होईल.

     प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून तातडीने चौकशी सुरु करावी व अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

    Post Views:  937

मुख्य संपादक

Card image

संतोष मधुकर घरत

आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501

Phone: 9766554999