पालघर (प्रतिनिधी): “मेहनत, चिकाटी आणि आईचा आशीर्वाद असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही,” याचे जिवंत उदाहरण म्हणजे लालोंडे (ता. डहाणू, जि. पालघर) येथील आदित्य अरुण पाटील होय. अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या अपर्णा अरुण पाटील यांच्या या पुत्राची नुकतीच ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदावर निवड झाली असून त्याची तलाठी सजा धाकटी डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर येथे झाली आहे.
वडिलांचे सत्र हरवल्यानंतर अपर्णा पाटील यांनी अवघ्या संसाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. दिवस-रात्र परिश्रम करून त्यांनी मुलाचे शिक्षण पूर्ण केले. कठीण परिस्थितीतही अपर्णा पाटील यांनी हार न मानता, आपल्या जिद्दीच्या जोरावर आणि मुलाच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्याला सक्षम बनविले. त्यांच्या अथक प्रयत्नांचा आज फळ मिळाले असून मुलगा सरकारी सेवेत रुजू झाल्याने कुटुंबावर आनंदाचा वर्षाव झाला आहे.
या यशामुळे केवळ पाटील कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण लालोंडे परिसराचा व कुणबी समाजाचा अभिमान वाढला आहे. गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी आदित्य पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, आई अपर्णा पाटील यांच्या मेहनती व संघर्षमय जीवनाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
आईच्या कष्ट, समर्पण आणि निश्चयामुळे मिळालेल्या या यशकथेने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. “मेहनत, चिकाटी आणि आईच्या आशीर्वादाने काहीही अशक्य नाही,” हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.