६५ आदिवासी कुटुंबांना अखेर हक्काची जमीन – पालघरमध्ये जमीनपट्टे वाटपाचा आनंदोत्सव सेवा पंधरवडा समारोप कार्यक्रमात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वाटप – संजय पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
पालघर (ता. ४): तालुक्यातील केळवा देवीचा पाडा येथील तब्बल ६५ आदिवासी कुटुंबांना अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर त्यांच्या घराखालील हक्काची जमीन मिळाली आहे. गट क्रमांक ६० या सर्व्हे क्रमांकातील जमिनीचे पट्टे महसूल विभागाने घडवून, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते शनिवारी (ता. ४) जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील सभागृहात वितरण करण्यात आले. ही वितरणप्रक्रिया सेवा पंधरवडा उपक्रमाच्या सांगता सोहळ्यात पार पडली.
केळवा देवीचा पाडा येथे गट क्रमांक ६० मधील सुमारे ८० गुंठे जमिनीवर ही ६५ घरे अनेक वर्षांपासून उभी आहेत. मात्र, ही घरे असलेली जमीन गुरुचरण जमिनीच्या श्रेणीत असल्याने ती कोणाच्याही नावावर नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांना त्यांच्या स्वतःच्या घराखालील जमिनीवर मालकी हक्क मिळत नव्हता.
ही समस्या लक्षात घेऊन शिवशक्ती संघटनेचे संजय पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले. त्यानंतर लाभार्थी आणि प्रशासन यांची दोन ते तीन महिने आधी संयुक्त बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने शासन स्तरावर पत्रव्यवहार सुरू केला. प्रशासनाने त्या बैठकीत “प्रचलित नियमानुसार लवकरच ही जमीन नियमानुकूल करण्यात येईल,” अशी खात्री दिली होती.
या प्रक्रियेला गती देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी १२ फेब्रुवारी रोजी पालघरचे उपविभागीय अधिकारी सुनील माळी यांना पत्र पाठवून, गुरुचरण जमिनीवरील घराखालील जमीन ग्रामविकास विभागाच्या तरतुदीनुसार निष्कासित करण्यास मान्यता दिली. त्यानंतर या प्रकरणाने गती घेतली.
सध्याच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच महसूल तहसीलदार यांनी विशेष पुढाकार घेऊन ही प्रक्रिया पूर्णत्वास नेली. पालघरचे उपविभागीय अधिकारी यांनी सर्व आवश्यक कागदपत्रीय प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्याने ६५ कुटुंबांच्या नावावर जमीनपट्टे मंजूर झाले असून, यापैकी ६१ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष वाटप करण्यात आले आहे. उर्वरित चार लाभार्थ्यांच्या त्रुटी दूर झाल्यानंतर त्यांना देखील पट्टे दिले जाणार आहेत.
या कार्यक्रमात सामाजिक भान ठेवून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संजय पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, तसेच विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या भूमीपट्ट्यांच्या वितरणामुळे अनेक वर्षांपासून जमिनीच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी कुटुंबांचे स्वप्न साकार झाले आहे. जमीन नावावर झाल्याचे पाहून अनेक लाभार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले असून त्यांनी प्रशासन आणि स्थानिक नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार मानले.