तारापूर औद्योगिक क्षेत्रात घातक रसायनाची बेकायदेशीर वाहतूक ! मुख्य केमिकल माफियांवर गुन्हा दाखल
बोईसर ! तारापूर औद्योगिक वसाहतीतून घातक रसायनाची बेकायदेशीर आणि संशयास्पद वाहतूक करणाऱ्या एका टँकरला ६ मे रोजी खैरापाडा तपासणी नाक्यावर अडवण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली असून, पुढील तपासात या रसायनाचा साठा अत्यंत घातक स्वरूपाचा असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात प्रमुख केमिकल माफिया नील राऊळ, विवेक वडे आणि शुभम दुबे यांच्यावर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेला टँकर (एम.एच.०४ डी.एस.९६२८) हा अष्टविनायक एंटरप्रायझेस या कंपनीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. टँकर चालकाकडे रसायनाच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली. त्यानंतर मंडळाच्या पथकाने रसायनाचे नमुने ताब्यात घेऊन ठाणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.
२६ मे रोजी प्राप्त झालेल्या प्रयोगशाळा अहवालानुसार, नमुन्यातील सीओडी (Chemical Oxygen Demand) पातळी १२३,२०० मिग्रॅ/लिटर इतकी असल्याचे निष्पन्न झाले, जी अत्यंत घातक आणि पर्यावरणासाठी धोकादायक मानली जाते. तसेच, अष्टविनायक एंटरप्रायझेसने वाहतुकीपूर्वी \\\'मॅनीफेस्ट (फॉर्म १०)\\\' ऑनलाईन सादर न केल्याने, त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे सरळसरळ उल्लंघन केले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी नील राऊळ, विवेक वडे आणि शुभम दुबे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, टँकरमध्ये भरलेले रसायन कोणत्या कंपनीतून आले होते, याची माहिती घेण्यासाठी संबंधित कंपनीविरोधात चौकशी आणि पुढील कारवाईसाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
औद्योगिक क्षेत्रात घातक रसायनांच्या वाहतुकीतील बेशिस्तपणा आणि पर्यावरणावर त्याचा होणारा दुष्परिणाम हे गंभीर प्रश्न असून, या प्रकरणामुळे संबंधित यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून या संदर्भात अधिक कडक उपाययोजनांची मागणी केली जात आहे.