गुंदले गावात अवैध गुटखा निर्मितीचा पर्दाफाश!
पालघर!गुंदले ग्रामपंचायत हद्दीतील दोन बंगला परिसरात शनिवारी सकाळी साडेअकरा ते पावणे बारा दरम्यान एका प्लास्टिक गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मात्र ही आग केवळ अपघाती नसून, गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर गुटखा निर्मितीच्या गोरखधंद्याचा भांडाफोड करणारी ठरली आहे.
आगीत गोडाऊन जळून खाक झाले असले, तरी त्यामध्ये दिवाना आशिक’नावाचा सुगंधित गुटखा तयार केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोडाऊनमध्ये गुटख्याच्या मोठ्या प्रमाणावरील पुड्या, कच्चा माल, पॅकिंग साहित्य, यंत्रसामग्री आढळून आल्याने हा धंदा किती मोठ्या प्रमाणावर चालू होता, हे समोर आले आहे.
पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर बिनधास्त गोरखधंदा!
विशेष म्हणजे, हा अवैध गुटखा उद्योग थेट बोईसर पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ सुरू होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या या उद्योगाची माहिती पोलिसांना नव्हती? की त्यांच्या संमतीनेच हा धंदा फोफावला? असा ज्वलंत प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
अग्निशमन यंत्रणा अनुपस्थित; नागरिकांच्या जिवाशी खेळ
घटनेदरम्यान परिसरात कोणतीही अग्निशमन सेवा उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्लास्टिकच्या गोडाऊनमध्ये आगीसारखी दुर्घटना होऊनही कोणताही तातडीचा प्रतिसाद मिळाला नाही, ही गंभीर बाब समोर आली आहे. ही धोकादायक साठवणूक केवळ कायद्याचे उल्लंघन नसून, सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्यासारखी असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
मुख्य सूत्रधार कोण? चौकशीची गरज
या आगीमुळे केवळ एक गोडाऊन भस्मसात झाला नाही, तर अवैध गुटखा उत्पादनाचा सडका चेहरा चव्हाट्यावर आला आहे. गुटख्याचे कच्चे साहित्य नेमके कुठून येत होते? कोण कोण यामध्ये सहभागी होते? हे शोधून मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासन व पोलिसांची कसोटी; परिसरात भीतीचे वातावरण
सध्या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासन आणि पोलीस विभाग या प्रकरणात कितपत पारदर्शकता ठेवून कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.