पालघरमधील येथील केलवा रिसॉर्टमध्ये १७ वर्षीय तरुणीवर चुकून गोळी झाडली; प्रकृती चिंताजनक

   

पालघर!पालघर जिल्ह्यातील केळवे येथील एका खाजगी रिसॉर्टमध्ये घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. फिरण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय तेजल भिडे या तरुणीवर चुकून गावठी कट्ट्यातून गोळी झाडली गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. सद्यस्थितीत तिच्यावर बोईसरमधील बेटेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

  प्रकरण असे घडले… 
     प्राथमिक माहितीनुसार, तेजल भिडे ही तिचा प्रियकर दिनेश धोडी (रा. लोखंडीपाडा) याच्यासोबत केळवे येथील रिसॉर्टमध्ये आली होती. रूममध्ये पोहोचल्यानंतर दिनेश वॉशरूममध्ये गेल्यानंतर तेजलने त्याची बॅग उघडून तपासली. या बॅगेत तिला गावठी कट्टा आढळून आला. कुतूहलाने तिने कट्टा हातात घेतला असता, चुकून ट्रिगर दाबला गेला आणि गोळी झाडली गेली. गोळी तिच्या मानेत घुसल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.

 प्राथमिक आरोग्य केंद्रातून खासगी रुग्णालयात हलवले
      घटनेनंतर घाबरलेल्या दिनेशने रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांना माहिती दिली आणि तातडीने तेजलला पालघरच्या माहीम प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला बेटेगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांकडून तिच्या मानेतील गोळी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून तिची प्रकृती चिंतेत टाकणारी आहे.

 पोलिसांचा तपास सुरू
     या घटनेनंतर पालघर जिल्हा पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी पीडित तरुणीच्या नातेवाईकांशी संवाद साधत तपशीलवार माहिती घेतली. पोलिसांकडून दिनेश धोडी याच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्याकडील गावठी कट्टा बेकायदेशीर होता का, याचाही तपास सुरू आहे.

 पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 
    अल्पावधीत केळवे परिसरात घडलेल्या दोन गंभीर घटनांमुळे स्थानिक पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू याच परिसरात झाला होता. यामुळे रिसॉर्ट चालकांकडून ग्राहकांच्या ओळखपत्रांची व कागदपत्रांची तपासणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

     केळवेतील या घटनेने संपूर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, तरुणाईमध्ये असलेल्या शस्त्रांचा गैरवापर आणि रिसॉर्टमध्ये सुरक्षेच्या ढिलाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोलिसांचा तपास सुरु असून लवकरच सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे.

    Post Views:  141

मुख्य संपादक

Card image

संतोष मधुकर घरत

आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501

Phone: 9766554999