डहाणू : वाढवण बंदराच्या जमिनी व्यवहारात मोठा गैरव्यवहार उघड – उच्चस्तरीय चौकशीची मागणी
डहाणू | आंतरराष्ट्रीय पातळीवर उभारल्या जाणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाढवण बंदर प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, त्याचबरोबर या परिसरातील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात संशयास्पद घडामोडी घडताना दिसत आहेत. परिसरातील जमिनीचे दर गगनाला भिडत असताना, काही दलाल आणि परप्रांतीय नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे समजते.
दरम्यान, मौजे बावडे गट क्र. ३१९/४, क्षेत्र १.१६.४० आर ही जमीन बंदर प्रकल्पासाठी अधिग्रहित केली जात आहे, आणि यामध्ये २० गुंठे जमिनीचे मुल्यांकन कृत्रिमरीत्या वाढवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या व्यवहारांमध्ये जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची संदेहास्पद भूमिका असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, केतखाडी गावातील अमित भालचंद्र चुरी यांनी ही जमीन आपल्या मेहुण्याला – मितेश राजेंद्र ठाकूर याला तब्बल २ कोटी २० लाख रुपयांना विकल्याचा व्यवहार दाखवण्यात आला आहे. हा व्यवहार डहाणू उपनोंदणी कार्यालयात नोंदवण्यात आला असून, मितेश ठाकूर यांच्या नावाने बोईसर येथील एचडीएफसी बँकेत खाता नसतानाही धनादेश दिल्याचे भासवून बोगस व्यवहार घडवून आणल्याचे आरोप होत आहेत.
या साऱ्या प्रकरणामागे जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी काळी कमाई पांढरी करण्याचा डाव रचल्याचा आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते अमित चौबे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, जर सखोल चौकशी झाली, तर वाढवण बंदर प्रकल्पाला लागून असलेल्या जमिनींचे खरे मुल्यांकन आणि व्यवहारांची पारदर्शकता उघडकीस येईल, तसेच शासन व नागरिकांची होणारी फसवणूक रोखता येईल.
हा प्रकरण उघडकीस आल्यानंतर स्थानिकांमध्ये खळबळ माजली असून, यापुढे प्रशासन या व्यवहारांची गंभीर दखल घेते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.