सफाळे ! चहाडे रस्त्यावर मोरीचे काम सुरू, फलक नसल्याने अपघाताचा धोका
सफाळे ! सफाळे पूर्व भागातील तांदूळवाडी - चहाडे रस्त्यावर सध्या मोरी बांधण्याचे काम सुरू असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. मात्र, काम सुरू असल्याची कोणतीही माहिती देणारा फलक ठेकेदाराने लावलेला नसल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
चहाडे येथे मोरीचे काम तर खडकोळी परिसरात पाईप लाईन टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. मात्र, कोणतीही सूचना फलक किंवा चेतावणी लावण्यात आली नसल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस या रस्त्यावरून अवजड वाहने मोठ्या संख्येने ये-जा करीत असल्याने दुर्घटनेची शक्यता अधिक आहे.
सध्या यात्रा, लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ अधिक आहे. स्थानिक नागरिकांनी याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाच्या ठिकाणी फलक लावण्याच्या सूचना ठेकेदाराला द्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.